पेण तालुक्यातील मळेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी यादीवरून झालेला वाद चांगलाच पेटला असून, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. महिला ग्रामपंचायत सदस्याशी गैरवर्तन करून मारहाण केल्यासह अन्य दोघांना दुखापत केल्याच्या आरोपावरून पेण पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी वाचून दाखविण्यात आली. या यादीतील काही लाभार्थी बाहेरील गावातील असल्याचा आक्षेप घेण्यात आला. तसेच मौजे वडगाव गावठाण हद्दीत त्यांना घरकुल बांधण्यास हरकत असल्याचे लेखी निवेदन वैशाली साळवी, सुनील साळवी, कैलास पवार, सुहास पवार आणि संजीवनी पवार यांनी ग्रामसेवकांकडे दिले होते.
या निवेदनात दिलीप पाटील, जनार्दन पाटील, बुधाजी तायडे आणि प्रणेश पाटील यांच्या नावांवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. हे निवेदन ग्रामसभेत वाचून दाखवावे, अशी मागणी करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य दयान पेणकर, कमलाकर म्हात्रे आणि उपसरपंच मच्छिंद्र म्हात्रे यांनी विरोध केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ग्रामसभा बरखास्त झाल्याचे जाहीर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एफआयआरनुसार, दिलीप पाटील याने महिला सदस्याशी शिवीगाळ करून गैरवर्तन केले तसेच लाकडी धोपटण्याने त्यांच्या डोक्यावर व खांद्यावर मारहाण केली. जनार्दन पाटील, दयान पेणकर, कमलाकर म्हात्रे, धनिका पाटील, निलिमा पाटील आणि जयवंती पाटील यांनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या सुनील साळवी यांना दगडाने मारहाण करण्यात आल्याचे, तर संजीवनी पवार यांच्या डोक्यात लाकडी धोपटणे मारून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोंधळात तेजस्विनी साळवी यांचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचाही उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
या प्रकरणी पेण पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पेण पोलिस करीत आहेत.