खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वडखळ ते भरणे नाका वाहनांच्या लांबच लांब रांगा, चाकरमान्यांचा संताप शिगेला!

रायगड | अमुलकुमार
गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर आणि भरणे नाका या प्रमुख ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचल्याने प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात रवाना झाले आहेत. रेल्वे गाड्यांनाही मोठी गर्दी असल्याने अनेकांनी खासगी वाहने आणि एसटी बसचा पर्याय स्वीकारला. मात्र, महामार्गावर पोहोचल्यानंतर त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
खड्ड्यांमुळे वाहतूक संथ
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून वाहने सावधपणे आणि अत्यंत कमी वेगाने मार्गक्रमण करीत आहेत. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून त्याचा परिणाम मागील वाहनांवर होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोंडी अधिकच गंभीर झाली.
महामार्गाच्या कामाला अनेक वर्षे लोटली तरी प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याने चाकरमान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही महामार्गाच्या अवस्थेवरून नाराजी व्यक्त होत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्गाचे काम आणि खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
गणरायाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांना खड्डे, कोंडी आणि संथ वाहतुकीचा सामना करावा लागत असल्याने यंदाचा कोकण प्रवास अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.