बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला मागील बाजूने अशोक लेलँड आयफाय टेम्पो येऊन जोरदार धडकला. या अपघातात लेलँड चा क्लीनर जागीच ठार झाला तर चालक किरकोळ जखमी झाला.
पोलादपूर येथे मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर आयशर टेम्पो (क्रमांक एमएच 46 बीएम 3925) हा ड्रायव्हर बळीराम बद्रीलाल सोलंकी (वय 46 वर्षे पीदमपूर, जि.धार, मध्य प्रदेश) याने कोणत्याही प्रकारच्या सांकेतिक पार्किंग लाईट न लावता धोकादायक स्थितीत उभा केला होता. यावेळी अशोक लेलँड बडा दोस्त आयफाय टेम्पो( क्रमांक एमएच 10 डीटी 6596) घेऊन फिर्यादी ड्रायव्हर मल्लिकार्जुन वासुदेव ढवण (59 वर्ष, विटा, ता. खानापूर, जि.सांगली) मुंबईकडून गोव्याकडे चालला असताना आयशर टेम्पोला धडकला. या अपघातात अशोक लेलँड टेम्पोचा ड्रायव्हर मल्लिकार्जुन ढवण हा जखमी झाला तर त्याच्यासोबतचा क्लीनर ताराचंद शिवाजी विहापूरे (वय 47 वर्षे) हा लेलँड टेम्पोचा दर्शनी भाग आयशर टेम्पोच्या मागील भागावर आढळून पूर्णपणे आत चेपला गेल्याने जागीच ठार झाला.
हा अपघात झालेल्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झालेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच श्रीकाळभैरवनाथ रेस्क्यू टिम आणि पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अशोक लेलँड टेम्पो चा ड्रायव्हर ढवण आणि मयत विहापुरे यांना नुकसानग्रस्त टेम्पोच्या बाहेर काढण्यास सहकार्य केले.
याप्रकरणी आयशर टेम्पोचा ड्रायव्हर बळीराम सोलंकी याच्या विरुद्ध गुन्हा रजि.नं. 97- 2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106 (1),125(अ),125(ब), 285 प्रमाणे भारतीय दंड संहिता 304(अ), 337, 338, 283 प्रमाणे गुन्हा पोलीस हवालदार टी.टी. सुतार यांनी दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.