गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी पोलिस मित्र संघटनेच्या वतीने कर्जत-शिरामपूर परिसरात गणपती बाप्पाची प्रतिकात्मक स्थापना करून रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी संघटनेने यापूर्वीच संबंधित बांधकाम विभागांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मागणीची दखल न घेतल्यास गणपती बाप्पाला घेऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, संबंधित विभागांकडून अद्याप ठोस कार्यवाही किंवा लेखी प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दिलेल्या इशाऱ्यानुसार ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाची स्थापना करून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
एक रस्ता खड्डेमुक्त होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा हा आंदोलन केवळ सध्याच्या ठिकाणापुरते मर्यादित न ठेवता, प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील इतर खड्डेमय रस्त्यांवरही ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
गणेशोत्सवापूर्वी संबंधित विभागांनी रस्ते दुरुस्तीबाबत ठोस आश्वासन दिल्यास आंदोलन स्थगित करण्याचा विचार केला जाईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास शिरामपूर येथील नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार लेखी निवेदने दिली. मात्र, यावेळी आमच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता गणपती बाप्पाला साक्षी ठेवून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि गणपती बाप्पाचा तरी आदर करावा, असे आवाहन पोलिस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात नागरिक तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. अशा परिस्थितीत खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन रस्ते दुरुस्तीबाबत कोणती भूमिका घेते आणि गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.