खारघरच्या मॅकडोनाल्ड्सच्या बर्गरमध्ये लोखंडी तुकडा सापडल्याचा दावा; ग्राहकाची FDAकडे तक्रार, कारवाईकडे लक्ष

रायगड | अमुलकुमार जैन
खारघर येथील लिटिल वर्ल्ड मॉलमधील मॅकडोनाल्ड्समध्ये ग्राहकाला देण्यात आलेल्या बर्गरमध्ये लोखंडी खडा सापडल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित ग्राहकाने बर्गरमध्ये लोखंडी वस्तूसदृश खडा आढळल्याचे सांगितले असून, याबाबत मॅकडोनाल्ड्सच्या व्यवस्थापकाकडे जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्गरमध्ये लोखंडी खडा आढळल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकाने तत्काळ मॅनेजरकडे याबाबत विचारणा केली. मात्र, संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. या प्रकाराचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मनाई करण्यात आल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.
या प्रकारामुळे ग्राहकाने नाराजी व्यक्त करत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला. बर्गरमध्ये नेमकी कोणती वस्तू आढळली आणि ती अन्नपदार्थात कशी आली, याबाबत अधिकृत तपासणीनंतरच स्पष्टता होऊ शकणार आहे.
 संबंधित ग्राहकाने या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) कॉलद्वारे तक्रार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे FDAकडून या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अन्नपदार्थाचा नमुना तपासला जातो का आणि दोष आढळल्यास कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत मॅकडोनाल्ड्स व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.