तालुक्यातील लोहारे येथील श्रीराम विद्यालय येथे विद्यार्थिंनींना मासिक पाळी स्वच्छता व आरोग्य विषय मार्गदर्शन कार्यक्रम प्रारंभ फाउंडेशनमार्फत आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थिंनींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये त्यांच्या शारिरीक तसेच अवयव स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रारंभ फाउंडेशन महाड यांच्यावतीने डॉ. प्राजक्ता रहाळकर यांनी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी राखायची शारिरीक स्वच्छता व आरोग्य तसेच विविध साधनांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिल्पा मंगेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करून संस्थेचे सदस्य मंगेश शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थिंनींना नवेनगर महाड येथील समाजसेविका समिती निलिमा राजेय भोसले यांच्यामार्फत सॅनिटरी पॅड नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक विजय कडुसकर यांनी अशा उपक्रमांमुळे मुलांच्या आरोग्यविषयक जागृतीत वाढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक विजय कडुसकर, सहशिक्षिका एस.व्ही. कडूसकर, सहशिक्षिका एस.डी.काळे, डी.बी.काळे, भालेराव आदी मान्यवर शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.