दिवाळी सणाचा आनंद सर्वत्र असताना कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागात आजही पाणी टंचाई, चारा टंचाई आणि वाढत्या महागाईने शेतकरी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून वर्षे उलटली, तरी प्रत्यक्षात सवलती फक्त कागदावरच असल्याचा आरोप होत आहे.
क्रांतिज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्थेने प्रांताधिकारी,कर्जत यांच्याकडे यापूर्वी ९ कलमी मागण्यांचे निवेदन दिले होते. त्या मागण्यांमध्ये नद्या-नाले खोलीकरण, टँकरने पाणी पुरवठा, बाधित शेतकऱ्याला ५० हजार मदत,शेतमजुराला २५ हजार मदत, विद्यार्थ्यांची फी माफ, रेशनवर तेल-साखर पुरवठा, भटक्या-पालावर राहणाऱ्या कुटुंबांना थेट मदत आणि संपूर्ण कर्जमाफी यांचा समावेश होता.
मात्र, २०२२ आणि २०२६ उजाडला तरी त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.आजही कर्जत तालुक्यात,कशेळे भागात पाण्यासाठी वणवण, जनावरांसाठी चारा,भात, नाचणी,वरई पिकाचे नुकसान आणि रेशनवर पुरेसे धान्य मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
“वैज्ञानिक निकष,पाहणी, माहिती संकलन या नावाखाली वेळकाढूपणा सुरू आहे. तोपर्यंत शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. ऐन दिवाळीत सरकारने दिलासा द्यावा,”अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षा इंदू वसंत केवारी यांनी केली आहे.
आजही मागणी तीच – तातडीने उपाययोजना लागू करा!.
दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने लागू करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा दिवाळीनंतर प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी महिला अध्यक्षा इंदू केवारी,सचिव जीजा दरवडा, प्रमिला पादीर,कोमल भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.