खालापूरमधील संभाव्य पाणीटंचाईवर आमदार महेंद्र थोरवे आक्रमक; जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे सक्त निर्देश

चौक | अर्जुन कदम
आगामी पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी आमदार महेंद्र थोरवे आक्रमक हे आक्रमक झाले असून जलजीवन मिशनच्या कामांचा  आढावा घेऊन संबंधित यांना सक्त सूचना केल्या.यावेळी अधिकाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
 खालापूर तालुक्यात आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खालापूर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठ्याच्या योजनांमधील अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच, अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेता कामात हलगर्जीपणा केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात २६ सप्टेंबर रोजी जलजीवन मिशन योजनांसह तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, अपूर्ण असलेली कामे, विविध योजनांमधील अडचणी तसेच आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तेथील समस्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.नागरिकांना पाणी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार –
पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे. पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू; मात्र, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असे आमदार थोरवे यांनी सांगितले.
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत, त्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, पाणीटंचाईचा प्रश्न केवळ बैठकीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उपाययोजना राबविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे –
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे. योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही आमदार थोरवे यांनी दिला.
या बैठकीला तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी संदीप कराड, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील, पंचायत समिती सदस्य रितेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जलजीवन मिशनसह तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अपूर्ण कामांची पूर्तता आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.