सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये सायबर जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असून, कोणत्याही आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्यास देऊ नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन माणगांव पोलिसांनी केले आहे. कमी वेळेत अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती सायबर फसवणुकीसाठी वापरली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असताना सायबर गुन्हेगारांकडून विविध क्लृप्त्या वापरून सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. फेक जॉब, गुंतवणूक, कर्ज किंवा कमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा वापर इतरांकडून केला जातो. अशा प्रकारे फसवणुकीतून मिळालेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा केली जाऊ शकते. अशा खात्यांना ‘म्यूल अकाउंट’ (Mule Account) असे म्हटले जाते.
म्यूल अकाउंटचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळविण्यासाठी केला जाऊ शकतो. सुरुवातीला खातेदाराला कमिशन किंवा आर्थिक लाभाचे आमिष दाखविले जाते; मात्र पुढे त्याच बँक खात्याचा वापर गैरकृत्यांसाठी झाल्यास संबंधित खातेदाराची चौकशी होऊ शकते आणि परिस्थितीनुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे केवळ आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआयची माहिती अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे.
माणगांव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या संशयास्पद फोन कॉल्स, संदेश आणि ऑनलाइन ऑफर्सवर सहज विश्वास ठेवू नये. नोकरी, गुंतवणूक, कर्ज किंवा कमिशनच्या नावाखाली बँक खाते वापरण्याची मागणी झाल्यास सावध राहावे. आपल्या खात्यात आलेली संशयास्पद रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करू नये आणि कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खात्याचा गैरवापर होऊ देऊ नये.
सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने संबंधित बँकेशी आणि पोलिसांशी संपर्क साधावा. सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधता येतो. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येते.
“लालसेला बळी पडू नका, जागरूक राहा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवा,” असा संदेश देत माणगाव पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी स्वतः जागरूक राहून इतरांनाही सायबर सुरक्षेबाबत माहिती द्यावी, जेणेकरून ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.