हेटवणेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! ठिय्या आंदोलनाला यश; मागण्यांवर प्रशासनाचं लेखी आश्वासन

Farmers' Uprising Over Hetavane Water
पेण | प्रतिनिधी 
हेटवणे पाईपलाईनमधून शेतीसाठी आणि पिण्यासाठी नियमित पाणी मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलेले ठिय्या आंदोलन यशस्वी झाले. कांदळेपाडा, रोडे, कश्मिरे, मळेघर, कांदळे आणि उचेडे येथील २०० हून अधिक शेतकरी व ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
आंदोलकांनी आरोप केला की, शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचे पाणी कंपन्यांकडे वळवले जात असून शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. या तक्रारीची दखल घेत तहसील कार्यालय, हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पूर्वीप्रमाणे उघड्या कालव्याच्या नियमानुसार चावी किंवा तोटीची व्यवस्था करून पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी दिले जाईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, रोजगार हमीची कामे सुरू करणे आणि जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा नियमित करणे, या मागण्यांवरही सकारात्मक आश्वासन देण्यात आले. “आमच्याकडून १२०० रुपये पाणीपट्टी घेतली जाते; मात्र चार-पाच दिवसांनी कमी दाबाने पाणी मिळते. जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या, तरी योग्य भरपाई मिळाली नाही,” अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पाईपलाईनवरून रस्ता करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून, मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी दिला.