रायगड प्रेस क्लब संलग्न पोलादपूर प्रेस क्लबच्या आयोजित शेतकरी जनआक्रोश आंदोलनामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून रॅलीची सुरुवात होऊन तहसील कार्यालयात तहसीलदार कपिल घोरपडे यांना निवेदन देऊन सांगता झालेल्या या जन आक्रोश आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना पीक पहाणी चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तालुक्यात 60 ते 70 टक्के भात शेतीसह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करून पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याचा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उर्वरित १४ तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर पोलादपूर तालुक्यातील आमची माती आमची माणसं सामाजिक संघटनेनेही पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर पोलादपूर प्रेस क्लबच्या सदस्यांनी देखील पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, असे निवेदन देऊन शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी हजारोंच्या संख्येने शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी रायगड प्रेस क्लब चे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी मनोगत व्यक्त करताना पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन दुष्काळग्रस्त तालुका घोषित करून न्याय द्यावा अशी मागणी करत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर तालुकाच नव्हे तर रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नामदेव शिंदे, रामदास सपकाळ, मंगेश मोरे, नारायण साने यांनीही मनोगत व्यक्त करून पाठिंबा जाहीर करत दुष्काळग्रस्त तालुक्याच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कंपाऊंडजवळ प्रकाश कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप जाबडे यांनी केले तर आभार पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मेहता यांनी मानले.
यावेळी परिषदेचे विभागीय सचिव शिवराज पार्टे, संघटिका सीमा प्र. मोरे, पोलादपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी दत्तात्रय उतेकर, गुलाबराव येरुनकर, समीर बुटाला, धनराज गोपाळ, देवेंद्र दरेकर, सिद्धेश पवार, निरंजन मोरे हे पत्रकार मोर्चात सहभागी झाले. उद्योजक रामदास कळंबे, उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिलेल्या महत्वपूर्ण सहकार्याने जनआक्रोश आंदोलन यशस्वी झाले.