सकाळ असो किंवा संध्याकाळ, अनेकांना गरमागरम कुरकुरीत पकोड्यांबरोबर चहा पिणे फारच आवडते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांनी याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
त्या सांगतात की, चहा हा जरी आले, वेलची आणि दालचिनी यांसारख्या अँटी-इन्फ्लामेटरी घटकांसह फायदेशीर असला, तरी पकोड्यांसारख्या तळलेल्या पदार्थांबरोबर घेतल्यास पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. चहामध्ये असलेल्या टॅनिन आणि ऑक्सलेटमुळे अन्नातून मिळणाऱ्या लोह आणि कॅल्शियमसारख्या पोषक घटकांचे शोषण कमी होते.
याशिवाय, वारंवार गरम केलेल्या तेलात तळलेले पकोडे शरीरात ट्रान्स फॅटी अॅसिड निर्माण करतात, जे दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. चहा बिस्किटे, कुकीज, समोसे किंवा ब्रेडसारख्या बेकरी पदार्थांसोबत घेणे टाळावे, कारण त्यात फॅट्स, साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते.
तज्ज्ञांनी हेल्दी पर्याय म्हणून बेक्ड रागी चिप्स, ढोकळा, चना चाट, मखाना, हंग दह्यासोबत खाकरा आणि एअर फ्राय केलेल्या भाज्या यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.