अर्भक व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (NHM) महत्त्वाचे उद्दिष्ट असून, याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘STOP Diarrhoea Campaign’ ही व्यापक मोहीम १६ जून २०२५ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया च्या नमुना नोंदणी प्रणाली (2017–19) नुसार, ५ वर्षांखालील बालकांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणजे अतिसार, ज्यामुळे सुमारे ४.८% बालके मृत्युमुखी पडतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्तनपान, पोषण, आरोग्य शिक्षण, लसीकरण, तसेच ओआरएस आणि झिंक गोळ्यांचा वापर हे महत्त्वाचे घटक ठरतात.
उरण तालुक्यात या अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून, माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) आणि सामाजिक वर्तन बदल संवाद (SBCC) या माध्यमांतून व्यापक जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण, स्वच्छ पाण्याचे महत्त्व, हात धुण्याच्या सवयीचे प्रशिक्षण, तसेच बालकांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण यावर भर देण्यात येत आहे.
उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी जनतेला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी, व विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना या अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय पातळीवरुन या मोहिमेस व्यापक प्रचार व प्रसार मिळत असून, “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ” हे यावर्षीचे घोषवाक्य जनमानसात रूजविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.