जिल्हा परिषदेची सभा रिसॉर्टमध्ये; अलिबागमधून पापलेट-सुरमईची खास खरेदी! भोजन व्यवस्थेच्या खर्चाचा तपशील जनतेसमोर येणार का?

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ३० ऑक्टोबर रोजी विसावा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली असून, या सभेच्या तयारीला गेल्या दोन दिवसांपासून वेग आला आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भोजनासाठी पापलेट, सुरमई यांसारख्या मासळीची खास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही मासळी अलिबाग येथून खरेदी करून विसावा रिसॉर्ट येथे पाठवण्यात आल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे सभेच्या आयोजनासोबतच भोजन व्यवस्थेच्या खर्चाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासकामांमधील अडचणी यांसारखे अनेक प्रश्न या सभेत मांडले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या सभेत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मात्र, सभेच्या विषयांबरोबरच आता रिसॉर्टमधील आयोजन आणि भोजन व्यवस्थेचीही चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी पापलेट-सुरमईसारख्या मासळीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने या संपूर्ण भोजन व्यवस्थेवर किती खर्च होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अलिबागमधून मासळी खरेदी करून ती रिसॉर्टमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली असली, तरी खरेदीचे प्रमाण, प्रत्यक्ष खर्च आणि भोजन व्यवस्थेसाठी करण्यात आलेली एकूण तरतूद यांचा अधिकृत तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.

दरम्यान, या भोजन व्यवस्थेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे मासळी खरेदीचा खर्च किंवा आयोजनातील आर्थिक व्यवहारांबाबत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होणाऱ्या सभेच्या आयोजनाचा खर्च आणि त्यातील पारदर्शकता याबाबत माहिती मिळणे हा जनतेचा रास्त अपेक्षेचा विषय आहे. विकासाच्या प्रश्नांवर होणाऱ्या सभेत जनतेच्या समस्यांना किती प्राधान्य मिळते आणि आयोजनाच्या खर्चाचा तपशील किती पारदर्शकपणे समोर येतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

=====================
सार्वजनिक निधीच्या वापरावर पारदर्शकतेची अपेक्षा
जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हिताशी संबंधित असतो. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या आयोजनासाठी आणि भोजन व्यवस्थेसाठी खर्च केला जाणार असल्यास त्याचा तपशील स्पष्ट होणे आवश्यक आहे. हा खर्च कोणत्या निधीतून केला जाणार आहे, त्याला प्रशासकीय मंजुरी आहे का आणि भोजन व्यवस्थेचे नियोजन कोणत्या पद्धतीने करण्यात आले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे गरजेचे आहे.