मोहल्ला परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पनवेल शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्ते अडवून वाहने उभी करणारे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे वाहनचालक आणि रिक्षाचालकांना नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी स्वतः लक्ष घातल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पनवेल शहरातील मोहल्ला परिसरात दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा मनमानी पद्धतीने उभ्या केल्यामुळे नागरिकांना तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनचालकांनी आपली वाहने निर्धारित पार्किंगच्या जागेतच उभी करावीत, रिक्षाचालकांनी अधिकृत रिक्षा थांब्यांचा वापर करावा आणि रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच, परिसरातील रस्त्यांवर धूळ खात पडून असलेल्या जुन्या व बेवारस वाहनांमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होत असून, ही वाहने हटविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेवक मुकीत काझी आणि युवा नेतृत्व जवाद काझी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची भेट घेतली. यावेळी मोहल्ला परिसरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.