पोलादपूरमध्ये पाणीटंचाईवर चर्चा; दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रशासनाला सवाल

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती बाबत आमची माती आमची माणसे सामाजिक संघटना आणि मनविसे अध्यक्ष ओंकार मोहिरे यांच्या पत्रानुसार तहसिलदार कपिल घोरपडे आणि गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत मनविसे अध्यक्ष ओंकार मोहिरे आणि गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्या गैरहजेरीत पोटतिडकीने समस्यांची मांडणी करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी संयमाने बैठक हाताळली. यावेळी आमची माती आमची माणसे सामाजिक संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना बुचकळ्यात टाकले.
पोलादपूर पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीमध्ये तहसीलदार घोरपडे, उपसभापती अनिता भिलारे, पं. स. सदस्य अनिल दळवी व साक्षी कांबळेकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश पालकर, पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पोलादपूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगर माथ्यावरील लोकवस्तीच्या गावांना पायथ्याशी असलेल्या नदीच्या प्रवाहात घातलेल्या वनराई बंधाऱ्यांचा काहीही उपयोग नसल्याचे तसेच खेडेगावांमध्ये वृद्ध मंडळींची संख्या अधिक असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाल्यास पाण्याची भरलेली भांडी घरापर्यंत घेऊन जाण्यास वृध्द असमर्थ असल्याकडे यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. जलजीवन मिशन या पाणीपुरवठा योजनेच्या अपयशाकडे कार्यकर्त्यांनी लक्ष वेधल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणादरम्यानच त्रुटी निर्माण झाल्याचे पं. स. सदस्य अनिल दळवी यांनी सांगितले.
रानबाजिरे येथील धरणातील पाणी शेती व अन्य ठिकाणी उपयोगात आणण्यासाठी प्राधान्य द्यावे महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदारीला तसेच पोलादपूर तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकांना आणि विकास कामांसाठी पाणी वापरण्यासाठी निर्बंध करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी काही कार्यकर्त्यांनी केली.
पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्यामध्ये काय अडचणी आहेत, याबाबत संस्थापक राज पार्टे यांनी तहसीलदार घोरपडे यांना थेट सवाल केला असता तहसीलदारांनी पिकपाणी सर्वेक्षण करण्यासाठी सहाय्यकांची कमतरता भासत असून तालुक्यात इ-केवायसी अभावी साधारणपणे सेक्टर दाखवून अधिक रक्कम लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा करता आली नसल्याचे सांगून या कामी संघटनेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कर्जतप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील लहूळसे गावातील प्रकल्पाबाबत संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी प्रश्न उपस्थित केला असता तहसीलदार घोरपडे यांनी या प्रश्नावर उत्तर देण्यास आपण सक्षम अधिकारी नसल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य अनिल दळवी यांनी सदरचा प्रकल्प 1984 दरम्यान केंद्र सरकारने मंजूर केला असून गेल्या काही वर्षापासून लहुळसे गावामध्ये सर्व्हेक्षण माहिती दिली. मात्र, याप्रश्नी अधिक चर्चा होण्याची चिन्हे पाहून तहसीलदारांनी संयमाने या विषयावर अधिक माहिती देण्यास सक्षम नसल्याचा पुनरूच्चार केला.
संस्थापक राज पार्टे यांच्यासह मुंबई कमिटी अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरि पवार, कार्याध्यक्ष विठ्ठल कळंबे, संदीप चव्हाण, मुख्य सरचिटणीस शिवाजी मालुसरे, संजय चोरगे, संजय कळंबे, नितेश शिंदे, अरुण मोहिते, श्रीधर नरे, लक्ष्मण कळंबे, गणेश गोगावले, अनिल बेलोसे, निलेश चाळके, अमित वाडकर, दीपक उतेकर आदी आमची माती आमची माणसं सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य संयुक्त बैठकीतील चर्चेमध्ये सहभागी झाले.