पोलादपूरमध्ये दुष्काळ व पाणीटंचाईवर उद्या संयुक्त बैठक; पेण, कर्जत, तळा आणि महाडचा दुष्काळी यादीत समावेश, पोलादपूरच्या मागणीवर काय निर्णय होणार?

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर होत असून, काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागत आहे. ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होऊ नये, यासाठी पोलादपूर तहसील कार्यालयात तहसीलदार कपिल घोरपडे आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन शुक्रवार, दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.
पोलादपूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करणे, पाणीटंचाईग्रस्त गावांची माहिती घेणे, संबंधित गावांना टँकरद्वारे अथवा अन्य योग्य माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत उपाययोजना निश्चित करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे, या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी, असे आवाहन आपली माती आपली माणसं संघटनेने काही दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे तहसील कार्यालयात केले होते. या अनुषंगाने ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
———————————————–
पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसल्याने घमासान चर्चा होणार?
आपली माती आपली माणसं संघटनेने काही दिवसांपूर्वी सर्वात आधी दिलेल्या एका निवेदनाद्वारे तहसील कार्यालयाकडे पोलादपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र, राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीमध्ये पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील 6 जिल्ह्यांमधील 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यात कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत, पेण, तळा आणि महाड या 4 तालुक्यांचा समावेश झाला आहे. यामुळे पोलादपूर तहसील कार्यालयामध्ये होणाऱ्या आजच्या संयुक्त बैठकीमध्ये घमासान चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.