पनवेलमध्ये FDA चा मोठा छापा; ४.२१ कोटींचा अन्नसाठा जप्त!

पनवेल | संजय कदम 

दिवाळीच्या सणासुदीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. पनवेल येथील जवाहर सहकारी औद्योगिक वसाहतीतील अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी या कंपनीवर छापा टाकून तब्बल ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थांच्या लेबलिंग व नामनिर्देशनात त्रुटी आढळल्याने आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान संबंधित अन्नपदार्थ चुकीच्या नामनिर्देशनाचे (मिसब्रँडेड) असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता निदर्शनास आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ आणि २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहायक आयुक्त (अन्न) ए. ए. मैत्रे आणि एम. आर. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) सचिन जाधव यांच्या देखरेखीखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल, मसाले यांसह विविध अन्नपदार्थांची मागणी वाढते. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी FDA कडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीदरम्यान ग्राहकांनीही अन्नपदार्थांचे लेबल, उत्पादन व अंतिम वापराची तारीख तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.