खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौक बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असून, नागरिकांनाही या समस्येची सवय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. बेशिस्त दुचाकी पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही मानवनिर्मित समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
चौक बाजारपेठ ही परिसरातील सुमारे चाळीस गावांसाठी महत्त्वाची व्यापारी आणि दैनंदिन गरजांची केंद्रबिंदू मानली जाते. येथे शाळा, अंगणवाड्या, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये, बँका आणि विविध व्यावसायिक आस्थापना असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. भाजीपाला, मटण, मासे, चिकन, किराणा, कपडे, मिठाई, औषधे, मोबाईल, सोन्या-चांदीची दुकाने तसेच इतर व्यवसायांमुळे बाजारपेठेत सतत गर्दी असते. परिणामी, वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांवरील उपलब्ध जागा अपुरी पडत आहे.
चौक परिसरात पोलीस यंत्रणा कार्यरत असली तरी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले जाते. त्यातच स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा नसल्याने वाहतुकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त उभी केलेली दुचाकी वाहने, फेरीवाल्यांनी व्यापलेली जागा आणि शिस्तीचा अभाव यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमित देखरेख, पार्किंगची व्यवस्था आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, चौक परिसराचा विकास झपाट्याने होत असून, आगामी काळात रेल्वेसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. परिसरातील गावांमध्ये नव्याने नागरिक वास्तव्यास येत असून, अत्याधुनिक बांधकामे आणि वाढत्या व्यावसायिक हालचालींमुळे या भागाचे महत्त्व वाढत आहे. मात्र, विकासाच्या या प्रक्रियेत वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. भविष्यात वाहनांची वर्दळ आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, चौक बाजारपेठेत रस्ता रुंदीकरण, नियोजित वाहनतळ आणि स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याशिवाय, चौक-वाशीवली रस्ता मुंबई-पुणे मार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यासाठी यापूर्वी नियोजन करण्यात आले होते आणि बाधितांना नोटिसा दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, या प्रकल्पाचे पुढे काय झाले, काम कोणत्या कारणामुळे रखडले आणि ते पुन्हा कधी सुरू होणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. चौक बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकच्या विकासाला गती देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.