पोलादपूर तालुक्यातील बोरज येथे घराला भीषण आग; घर जळून खाक, रोख रक्कम, दागिने अन् धान्यसाठ्याचे मोठं नुकसान!

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील साखर बोरज येथील एका घराला अचानक आगीच्या ज्वाळांनी लपेटल्यामुळे घर 80 टक्क्यांहून अधिक जळाले आहे. या घराशेजारी नवीन घर बांधणाऱ्या एका कुटुंबाने आगग्रस्त घरामध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील बोरज गावातील अशोक चंदू झाडाणे सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या घराशेजारी नवीन घर बांधणाऱ्या उषा पांडुरंग झाडाणे या अशोक झाडाणे यांच्या घरामध्ये राहत आहेत.
सकाळी कोणत्यातरी अज्ञात कारणाने अशोक झाडाणे यांच्या घराच्या छपरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. या धुराचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळांमध्ये रुपांतर झाले आणि घरातील व्यक्तींना सामान व चीजवस्तू तशाच ठेवून बाहेर पडून जीव वाचविण्यासाठी पळावे लागले. यामुळे अशोक झाडाणे यांच्या घरातील चीजवस्तू तसेच सध्या वास्तव्यास असलेल्या उषा झाडाणे यांच्याकडील नवीन घर बांधण्यासाठी आवश्यक रोख रक्कम तसेच दागिने, कपडे व धान्यसाठा छप्परातून आग भडकल्याने जळल्या. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांदेखील जळलेल्या अवस्थेत हाती लागल्या. बोरज येथील झाडाणे यांच्या घराला आग लागल्याचे समजताच साखर व बोरजसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.