महसूल अधिकाऱ्यांची ‘३ ते ५’ची ड्युटी! नागरिकांच्या तक्रारींसाठी आता दररोज दोन तास राखीव

PEN न्यूज ऑनलाइन टीम |

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत विविध धोरणात्मक निर्णय तसेच लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील महसूल कार्यालयांवर आहे. मात्र, नागरिक आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी किंवा अडचणी घेऊन महसूल कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून अनेकदा आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागत असल्याचेही समोर आले आहे.

ही परिस्थिती टाळण्यासाठी महसूल विभागाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी दररोज दुपारी ३ ते ५ ही वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या आणि तक्रारी थेट संबंधित महसूल अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत.

‘३ ते ५’ या वेळेत बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही

नागरिकांसाठी राखीव करण्यात आलेल्या या दोन तासांच्या कालावधीत कोणत्याही अंतर्गत बैठका अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे नियोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहून नागरिकांच्या तक्रारी समजून घेतील आणि त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य देतील.

नागरिकांच्या भेटीची स्वतंत्र नोंद

महसूल कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक कोणत्या कारणासाठी कार्यालयात आले, त्यांची तक्रार अथवा मागणी काय आहे आणि त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याची नोंद या माध्यमातून ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

प्रवेशद्वारावर ‘३ ते ५’ची वेळ ठळकपणे

नागरिकांसाठी राखीव असलेल्या दुपारी ३ ते ५ या वेळेची माहिती देणारा सूचना फलक महसूल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना संबंधित अधिकारी कोणत्या वेळेत भेटण्यासाठी उपलब्ध असतील, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे.

मंत्रालयाच्या फेऱ्या कमी होणार?

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची किंवा थेट मंत्रालयात धाव घेण्याची वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण झाल्यास महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी होण्यास मदत होणार आहे.

आता ‘साहेब भेटत नाहीत’ या नागरिकांच्या तक्रारीला आळा बसतो का आणि दुपारी ३ ते ५ या राखीव वेळेत प्रत्यक्षात नागरिकांना कितपत दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.