माणगांव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या युरिया खताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. माणगावचे कृषी विभाग मंडल अधिकारी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहिम अधिकाऱ्यांच्या समन्वयाने माणगाव तालुक्यासाठी सुमारे २५ टन युरिया खताची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी युरियाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ टन युरिया खताची खेप आरसीएफ केंद्रातून यापूर्वीच रवाना झाली असून, रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ती माणगांवात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तालुक्यातील संबंधित कृषी सेवा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना या खताचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, युरियाची तातडीची गरज लक्षात घेऊन आज शनिवारी पोलादपूर येथील बफर साठ्यातून सुमारे ८० गोणी युरिया खत उचलण्यात आले असून, ही खेप माणगाव तालुक्यातील गोरेगावच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
तसेच सोमवारी माणगांव तालुक्यातील इंदापूर आणि निजामपूर येथील कृषी सेवा केंद्रांवरही युरिया खताच्या काही गोण्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती या प्रतिनिधीला देण्यात आली आहे.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची हालचाल वेगाने
माणगाव तालुक्यातील युरिया टंचाईचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारा ठरला होता. याच पार्श्वभूमीवर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाध्यक्ष विलास सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली माणगांव तालुका काँग्रेसच्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन तसेच रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने युरिया टंचाईची गांभीर्याने दखल घेत पुरवठा वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माणगांवचे कृषी मंडल अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहिम अधिकाऱ्यांच्या समन्वयातून २५ टन युरियाची व्यवस्था होणे, ही त्याच दिशेने झालेली महत्त्वपूर्ण कार्यवाही मानली जात आहे.
याशिवाय पोलादपूरच्या बफर साठ्यातून ८० गोणी युरिया गोरेगावकडे रवाना झाल्याने तसेच इंदापूर व निजामपूर येथे सोमवारी खत उपलब्ध होणार असल्याने तालुक्यातील युरिया पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने केलेल्या या व्यवस्थेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असून, २५ टन युरियाची खेप रविवारी माणगावात पोहोचल्यानंतर त्याचे तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने वितरण व्हावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. युरिया पुरवठ्यातील ही वाढ तालुक्यातील टंचाई दूर करून खरीप हंगामातील पिकांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यात कितपत यशस्वी ठरते, याकडे आता माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.