महात्मा फुले महसूल लोक अदालत अभियान; प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीनं काढणार निकाली

महात्मा फुले महसूल लोक अदालत अभियान

दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान अभियान; पक्षकारांचा वाचणार वेळ 
रायगड | प्रतिनिधी 
समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्यही अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने आणि तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. एखाद्या प्रकरणात एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जातो. त्यामुळे अनेक महसुली दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.
विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक अदालतच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या परस्पर सहमतीने व तडजोडीने महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. यामुळे अर्धन्यायिक यंत्रणेवरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, पक्षकारांचा वेळ, श्रम आणि खर्चही वाचणार आहे.
महात्मा फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांना जलद आणि सुलभ न्याय देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.