नवी मुंबईतील शिरवणे गावात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘सनराईज हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग’च्या आवारात दोन तरुणांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीनंतर ही हत्या झाल्याची प्राथrमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनराईज हॉटेलजवळ दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या हातात बांबूसदृश वस्तू तसेच धारदार हत्यारासारखी वस्तू दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच हा वाद अधिक चिघळला आणि त्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या घटनेची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींची या घटनेशी नेमकी काय भूमिका आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता, अधिकृत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे मृत तरुणाची ओळख, हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची संख्या याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.