तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या युरिया खताच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेतली असून, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष समन्वयक विलास सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन व रास्ता रोको करण्याची तयारी असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. कृषी विभागाकडून येत्या दोन दिवसांत युरिया खताचा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
युरिया टंचाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा तसेच माणगाव तालुका कृषी विभागाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकारी नारायणकर यांनी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून युरियाची उपलब्धता वाढविण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी केवळ एका विशिष्ट युरिया खतावर अवलंबून न राहता कृषी विभागाने मान्यता दिलेल्या उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करण्याचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, विलास सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा प्रश्न आक्रमकपणे लावून धरण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने दोन दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते, याकडे आता माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी खताची तातडीची गरज असल्याने शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर वेळेत युरिया उपलब्ध होणे अपेक्षित आहे.