१४ वर्षांत १० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड; झिराड ग्रामपंचायतीचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

अलिबाग | अमुलकुमार जैन
 पर्यावरण संवर्धनासोबतच गावाच्या विकासाला चालना देण्याचा आदर्श उपक्रम अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने उभा केला आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्या पुढाकारातून सन २०१२ पासून ‘एक दिवस गावासाठी’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, गेल्या १४ वर्षांत १० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही ग्रामपंचायतीकडून घेतली जात आहे. ऋषी पंचमीच्या निमित्ताने ‘एक दिवस गावासाठी आणि एक दिवस ग्रामस्थांसाठी’ हा उपक्रम राबविला जात असून, मुंबई, पुणे यांसह विविध शहरांत वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांनाही त्यात सहभागी करून घेतले जाते. प्रत्येक ग्रामस्थाकडून एक झाड लावून घेतले जाते, तर आणखी एक झाड त्यांच्या घरी लावण्यासाठी दिले जाते. ‘झाड लावणे पुरेसे नाही, ते जगवणे महत्त्वाचे’ या भूमिकेतून वृक्षसंवर्धनावर भर देण्यात येत आहे.
गावाच्या विकासकामांनाही ग्रामपंचायतीकडून प्राधान्य दिले जात आहे. झिराड ग्रामपंचायतीकडे आठ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून, सध्या एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. गावाचा स्वतःचा पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी पाझर तलावाचे काम करण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी आमदार महेंद्र दळवी यांची मोलाची मदत होत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीचा स्वनिधी वाढविण्यासाठी ग्रामपंचायत इमारतीवर आणखी दोन मजले वाढवून ते भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन आहे. तसेच इमारतीच्या वातानुकूलितीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, नीलांग देसाई यांनी ग्रामपंचायतीला १० लाख रुपये किमतीची घंटागाडी प्रदान केली असून, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले. या घंटागाडीमुळे गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत, गावाचे नाव चांगल्या कामांसाठी कायम चर्चेत राहावे यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. कोविड काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने जाणवल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या वेळी माजी सरपंच दर्शना भोईर, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे, हरेश भोईर, रवी म्हात्रे, मंडळ अधिकारी श्रीनिवास मेठतरी, प्रशासक अरुण माळी, ग्राम अधिकारी संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.