रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या धगडवाडी येथे एका महिलेवर अज्ञात इसमाने अचानक पाठीमागून येऊन काठी व धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे धगडवाडी परिसरात भीतीचे व खळबळजनक वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धगडवाडी येथील रहिवासी असलेल्या संबंधित महिला सकाळी आपल्या घराच्या मागील वरांड्यामध्ये नेहमीप्रमाणे भांडी घासण्याचे काम करत होत्या. त्यावेळी परिसरात सामसूम असताना एका अज्ञात इसमाने दबा धरून त्यांच्या घराच्या मागील बाजूने वरांड्यात प्रवेश केला. महिला कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत या इसमाने त्यांच्या मागील बाजूस येऊन थेट त्यांच्या उजव्या कानाच्या भागावर काठीने जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सावरण्याआधीच, त्या अज्ञात हल्लेखोराने हातातील इतर कोणत्या तरी धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या मागील बाजूस तसेच हाताच्या बोटांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील किंवा घरातील लोक मदतीसाठी धावून येतील या भीतीने हल्लेखोर इसम घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पसार झाला. या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. महिलेवर हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, चोरीच्या हेतूने करण्यात आला होता, की इतर कारणाने? असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. या गंभीर प्रकाराबाबत जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घरात घुसून महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात असून हल्लेखोराचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहा.पोलीस महाडिक हे करत असून पोलीस हल्लेखोराच्या मार्गावर आहेत.
तर सदरच्या या घटनेमुळे कोलाड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय आले असून ह्या सर्व परप्रांतीयांची निवासस्थान कोलाड पोलीस स्टेशनच्या बाजूला 100 मिटरच्या अंतरावर आहे.कोलाड मोहल्ला कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मोठ्या बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती करून हे परप्रांतीय राहतात. हे सर्व परप्रांतीय पुरुष असून परप्रांतीय प्लास्टिकच्या वस्तू विकण्यासाठी संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागामध्ये फिरत असतात यांच्याजवळ 50 ते 60 मोटरसायकल असून हें परप्रांतीय प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचे काम करत असतात.
सदर हे परप्रांतीय आले कुठून तिथं ज्या बिल्डिंग मालकांनी त्यांना जागा दिली दिलेली आहे त्याच्याकडे त्या सर्व लोकांचे बायोडाटा आधारकार्ड आहेत का? त्यांची खरी माहिती आहे का. तसेच पोलीस स्टेशनच्या जवळ असणाऱ्या या परप्रांतीय लोकांची माहिती कोलड पोलीस स्टेशन जवळ असणे गरजेचे आहे जर पुढे एखादा गंभीर गुन्हा घडला त्याला जबाबदार कोण त्याकडेही असा प्रश्न निर्माण झाला असून या परपंत यांना सहारा देणाऱ्या बिल्डिंग मालकाची सुद्धा चौकशी होणे गरजेचे असल्याचे कोलाड परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.