मुंबई-गोवा महामार्गालगत कार्तिक हॉटेलसमोरील एका इमारतीत सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर माणगांव पोलिसांनी गुरुवारी दि. 10 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत मुख्य आरोपी हितेन छेडा याच्यासह एकूण ३२ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ऑडी कारसह नऊ वाहने आणि २९ मोबाईल फोन असा एकूण ७५ लाख ८२ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माणगावचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पवार आणि पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक हॉटेलसमोरील नारायण शेठ यांच्या मालकीच्या इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करीत गुरुवारी पहाटे संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी जुगार खेळणाऱ्यांची धावपळ उडाली.
छाप्यात एक ऑडी कार, दोन अर्टिगा कार, दोन मोटारसायकली आणि चार स्कुटी, अशी एकूण नऊ वाहने तसेच २९ मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची प्राथमिक किंमत ७५ लाख ८२ हजार २५ रुपये असल्याचे समजते. माणगांव शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या कथित अवैध जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहर व परिसरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी अधिक कठोरपणे कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.