‘भाजपमध्ये कॉन्ट्रॅक्टरना स्थान नाही’; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने दक्षिण रायगड भाजपमध्ये चर्चेला उधाण

अलिबाग | अमुलकुमार जैन
‘भाजपमध्ये कॉन्ट्रॅक्टरना स्थान नाही’, असे स्पष्ट वक्तव्य पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी दक्षिण रायगड भाजपच्या कार्यकारिणीच्या सभेत केल्याने जिल्ह्यातील भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हे वक्तव्य करताना सभागृहातून झालेल्या टाळ्यांचा प्रतिसादही त्यांनी सूचकपणे टिपला. त्यामुळे चव्हाण यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत आता राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
भाजपच्या संघटनात्मक बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर भर दिला. पक्षाच्या माध्यमातून राजकारण करताना वैयक्तिक आर्थिक हितसंबंध किंवा ठेकेदारीचे संबंध यांना कितपत स्थान असावे, हा मुद्दा त्यांच्या वक्तव्यामुळे ऐरणीवर आला आहे.
‘कॉन्ट्रॅक्टरना भाजपमध्ये स्थान नाही’, हा संदेश त्यांनी स्पष्टपणे दिल्यानंतर सभागृहातील वातावरणातही त्याचे पडसाद उमटले. उपस्थितांकडून झालेल्या टाळ्या पूर्ण ताकदीने न वाजल्याचे लक्षात घेत चव्हाण यांनी त्यावरही भाष्य केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे टाळ्यांमागील राजकीय संदेश काय होता, याचीही आता चर्चा सुरू झाली आहे.
दक्षिण रायगडमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षातील काही नेत्यांच्या राजकीय जवळिकीबाबत कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वीपासूनच चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या ‘कॉन्ट्रॅक्टर’विषयक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘कॉन्ट्रॅक्टरना पक्षात स्थान नाही’ असे सांगितले जात असेल, तर मग पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या जवळ असलेल्यांची भूमिका काय, असा सवाल आता कार्यकर्त्यांच्या चर्चेत पुढे येत आहे. चव्हाण यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसल्याने त्यांच्या वक्तव्याचा थेट रोख कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, स्थानिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
दक्षिण रायगड भाजपमध्ये आगामी काळात संघटनात्मक पातळीवर कोणती भूमिका घेतली जाते आणि चव्हाण यांच्या वक्तव्याचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ‘कॉन्ट्रॅक्टर कोण?’ या प्रश्नाबरोबरच ‘जवळचे कोण?’ हा सवालही दक्षिण रायगड भाजपच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.