तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांची पात्र दुथडी भरून नदीकडे वाहू लागली असून याकाळात नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणाऱ्या माशांची वलगन अनुभवणाऱ्या पोलादपूरकर मासेखाऊंना आदिवासी बांधवांकडून आता चोळईतून सावित्रीत जाण्याआधीच बांधणीचे मासे पकडून विकण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे. रासायनिक तसेच कोणत्याही प्रकारची कारखानदारी नसलेल्या पोलादपूर तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासळीची नैसर्गिक चव खवैय्ये मत्स्याहारींकडून विशेष चर्चेत असते.
वलगनीनंतर गोडया पाण्याची मासळी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे आदिवासी बांधवांनी सुसज्जता ठेवली असून एकीकडे तालुक्यातील वारकरी माळकरी चातुर्मासाचे नियम पाळत असताना तेवढयाच संख्येने मासेखाऊंची न पाळलेल्या श्रावण महिन्याअखेरिस मासे खाऊन जिभेचे चोचले पुरवले जात आहेत.
सध्या पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, चोळई आणि ढवळी या पाच प्रमुख नद्यांची पात्रं पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी धरणं आणि बंधारे बांधण्यात आले नसल्याने उथळच दिसत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नाल्यांची पात्रं दुथडी भरल्यानंतर नदीकडे येणाऱ्या नाले-ओहोळांतून तसेच शेतीच्या पाण्याच्या पाटातून विरूध्द दिशेने शेताकडे जाऊन उथळ व संथ पाण्यात अंडी अथवा पिले सोडणाऱ्या माशांनी अंडी सोडण्यासाठी उलटा प्रवास करण्याला गावाकडे ‘वलगन’ असे म्हणतात.
या काळात खेडेगावांतील ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी पागविणे, बांधणं घालणे, खोचेरे मारणे आणि जाळयात पकडण्याचे विविध मार्ग अवलंबिले आहेत. तालुक्यातील प्रदुषणरहित गोडया पाण्यातील वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळयाचे मासे, शिंगटया, टोलकी, डाकू मासा, शिवडयाचे पातं असे मासे तसेच किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडी), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडी)हे अष्टपाद उभयचर मांसाहारी खवैय्यांच्या जीभेवर वेगळीच अवीट चव रेंगाळत ठेवत असल्याने परगावी राहणाऱ्या पोलादपूरकरांना त्यांच्या ग्रामीण जीवनाच्या आठवणीच्या काळातील वलगनीचे विशेष अप्रुप वाटत असते.
पोलादपूर तालुक्यातील मळयाचे मासे मुंबईकर चाकरमान्यांना एस.टी.बसेसमधून तळून डब्यांतून पाठविली जात असून बस मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हे डबे घेण्यासाठी चाकरमानी मुंबईतील संबंधित स्थानकावर वाटदेखील पाहात असतात. रासायनिक तसेच कोणत्याही प्रकारची कारखानदारी नसलेल्या पोलादपूर तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासळीची नैसर्गिकरीत्या असलेली चव रासायनिक कारखानदारी असलेल्या महाड व खेड तालुक्यातील मत्स्यप्रेमींकडून विशेष वाखाणली जात आहे.
यंदा मांसाहारी विशेषत: मत्स्याहारींमध्ये आषाढ महिन्यातील आखाड साजरा झाला असून मासेखाऊंना श्रावण महिन्यातदेखील अधिक मासे मिळत असल्याने अनेकांनी श्रावण पाळण्याऐवजी गोड्या पाण्यातील मासे खाण्यासाठी चातुर्मास दूर्लक्षित केला आहे. यामुळे आदिवासी बांधवांनी गोड्या पाण्यातील मासे खाणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या नद्या आणि उपनद्यांच्या पात्रातील उथळ पाण्यात फडकं, दगडं अन् लाकडं लावून दोन ते चार फुटी उंचीचे बांध घातले आहेत. या बांधातून पात्रातील पाणी वाहून जात असताना आतापर्यंत आकाराने मोठे झालेले मासे बांधाजवळ जातात आणि लाकडं किंवा फडक्यात अडकतात किंवा उंच झेप घेऊन बांधावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी आदिवासी बांधवांकडून हे मासे चलाखीने पकडले जातात आणि विक्रीसाठी नेतात. या माशांना ‘बांधणीचे मासे’ म्हणून ओळखले जाते. सध्या पोलादपूरच्या लेप्रसी मिशन हॉस्पिटललगतच्या ब्रिटिशकालीन पुलाजवळून देवपूर, कोतवाल, कुडपणकडे जाणाऱ्या रस्त्यावरून नदीपात्रात घातलेल्या बांधाजवळ चोळई नदीतून सावित्री नदीत जाण्याआधीच मोठ-मोठ्या बांधणीच्या माशांची धरपकड करण्यासाठी आदिवासी कुटुंबं भरउन्हात ठिय्या देऊन बसल्याचे दिसून येते.
महाड व पोलादपूर तालुक्यातील गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यप्रेमी खवय्ये आवर्जून कापडे बुद्रुक येथील नरवीर तानाजी मालुसरे कमानीखाली बसलेल्या आदिवासी महिलांकडून अव्वाच्या सव्वा दर मोजून वेगवेगळया प्रकारचे मासे खरेदी करताना दिसतात. पोलादपूर येथील महाबळेश्वर रस्त्यालगतच्या मोरीच्या कठडयावर येणाऱ्या आदिवासी महिलांच्या टोपलीतील ताजे फडफडणारे मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरत असल्याने दिवसाकाठी दोन-चार खेपा मारणाऱ्या मासेखाऊंच्या मासेपुराणाच्या गप्पादेखील मनाजोगते मासे मिळेपर्यंत सुरू असतात.
प्रसिध्द नाटककार साहित्यिक तसेच राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक प्रल्हाद जाधव यांनी ‘पाण्यातले दिवस’ या पुस्तकामध्ये पोलादपूर तालुक्यातील बालपणीच्या वास्तव्यातील सावित्री नदीसह अन्य नद्यांमध्ये आढळून येणाऱ्या मत्स्यसृष्टीचे वर्णन नदीपात्रालगतच्या भ्रमंतीसह आढळून येत असल्याने पोलादपूर तालुक्यातील या वलगनीच्या आणि बांधणीच्या माशांना साहित्य क्षेत्रातही स्थान प्राप्त झाले आहे.