१३ वर्षीय प्रज्वलच्या आत्महत्येचे गूढ उकलणार कसे? Instagram Chat, Deleted Data अन् कथित ब्लॅकमेलिंगचा संशय; वडिलांची गृहमंत्र्यांकडे धाव

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा येथील रहिवासी तथा सध्या खालापूर तालुक्यातील रिस-मोहापाडा येथे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय प्रज्वल रणजित पाटील याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल, निष्पक्ष आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यात यावा, अशी मागणी प्रज्वलचे वडील रणजित परशुराम पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
प्रज्वल पाटील याने २३ ऑगस्ट २०२६ रोजी रिस येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत गंभीर शंका व्यक्त करत रणजित पाटील यांनी तपास यंत्रणांनी डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
प्रज्वलच्या मोबाईलमधील Instagram संभाषणे, Google Search History, Call Details तसेच इतर डिजिटल पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. कोणताही प्राथमिक निष्कर्ष काढण्यापूर्वी उपलब्ध डिजिटल पुरावे सुरक्षित करून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करणे आवश्यक असल्याचे रणजित पाटील यांनी म्हटले आहे.
तक्रारीनुसार, प्रज्वल तसेच परिसरातील काही अल्पवयीन मुला-मुलींमधील Instagram व अन्य डिजिटल संभाषणांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका व्यक्तीकडून अन्य एका मुलीशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ प्रज्वलकडे Instagram वर पाठविण्यात आल्याची माहिती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, या घटनेचा प्रज्वलच्या मानसिक स्थितीशी काही संबंध होता काय, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय काही Instagram Chats आणि History डिलीट करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित डिजिटल उपकरणे व पुरावे सुरक्षित करून कायदेशीर प्रक्रियेनुसार Deleted Chats, Messages आणि Digital History उपलब्ध असल्यास Recover करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत एका मुलाकडून प्रज्वलला महागडी गिफ्ट्स व परफ्यूम देण्यात येत असल्याचा तसेच घटनेपूर्वी अन्य एका व्यक्तीसोबत प्रज्वलचा वाद झाल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींचे Call Details, डिजिटल संभाषणे आणि इतर आवश्यक तांत्रिक पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी रणजित पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२६ रोजी रायगडचे पोलीस अधीक्षक तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे पुन्हा लेखी तक्रार देण्यात आली. त्याच दिवशी ई-मेलद्वारेही सखोल व निष्पक्ष तपासाची विनंती करण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले.
मात्र, अद्याप अपेक्षित स्वरूपाचा वैज्ञानिक व डिजिटल पुराव्यांवर आधारित तपास होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मृत प्रज्वल अल्पवयीन असल्याने त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामागे मानसिक दबाव, धमकी, कथित ब्लॅकमेलिंग, कोणाकडून प्रवृत्त करणे अथवा अन्य कोणते कारण होते काय, याचा सर्व बाजूंनी तपास होणे आवश्यक आहे, असे रणजित पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
मोबाईलमधील डिजिटल पुरावे, Instagram Chats, Google Search History, Call Details, उपलब्ध Deleted Data तसेच घटनास्थळाची परिस्थिती यांची डिजिटल फॉरेन्सिक व वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती रायगड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले.