केवळ आकडेवारीतील ‘ग्रोथ’च्या मागे न धावता बँकेचा पाया मजबूत करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत विकासावर भर देत कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. शाखांचा विस्तार, स्वमालकीच्या जागांमध्ये वाढ, एनपीए नियंत्रण, ठेवींमध्ये वाढ आणि कर्मचारी हिताचे निर्णय यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या एकूण २५ शाखांपैकी २२ शाखा आता स्वतःच्या मालकीच्या जागेत कार्यरत आहेत.
मुंबईतील के.सी. कॉलेज येथे बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बँकेच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. चेअरमन असिफ गुलाम मोहम्मद दादानं यांनी बँकेची वाटचाल केवळ नफ्याच्या आकड्यांवर आधारित नसून ग्राहकांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि गुणवत्तापूर्ण विकास या त्रिसूत्रीवर असल्याचे स्पष्ट केले.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी ८९४.६६ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये १०.०४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्ज व आगाऊ रकमेतही १०.३५ टक्के वाढ झाली असून ती ५६१.२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँकेचे एकूण उत्पन्न ८१.७३ कोटी रुपये, तर निव्वळ नफा ७.१८ कोटी रुपये झाला आहे.
गोवा राज्यातील पणजी शाखेसाठी दीर्घकाळ भाडेतत्त्वावर वापरात असलेली जागा बँकेने आता मालकीहक्काने घेतली आहे. त्यामुळे बँकेच्या मालमत्तेत भर पडण्याबरोबरच भविष्यातील खर्चावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. २५ पैकी २२ शाखा स्वमालकीच्या जागेत असणे ही बँकेच्या आर्थिक नियोजनाची महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
बँकेच्या आर्थिक शिस्तीचे महत्त्वाचे फलित म्हणून नेट एनपीए २.८४ टक्क्यांवर आला आहे. सातत्यपूर्ण वसुली, काटेकोर कर्जमूल्यांकन आणि कर्ज खात्यांची नियमित देखरेख यामुळे एनपीए नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे दादानं यांनी सांगितले. प्राधान्य क्षेत्रासाठी ३०७.७० कोटी, तर दुर्बल घटकांसाठी १७९.९८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.
बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आठ वर्षांपासून प्रलंबित वेतन थकबाकी अदा करण्यात आली आहे. तसेच बँक, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन आणि कोकण बँक ऑफिसर्स असोसिएशन यांच्यात सुधारित वेतन करार करण्यात आला. कर्मचारी हिताचा हा निर्णय त्यांच्या मनोबलासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बँकेला ‘बेस्ट मल्टी स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ हा टियर-२ श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर युसूफ कोंडकरी यांना ‘बेस्ट सीईओ ऑफ द इयर’, तर मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तबरेज बलबले यांना ‘सीटीओ ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ,ठाणे जिल्ह्यातील कौसा, तर मुंबई उपनगर मधील गोवंडी बँकेला बेस्ट ब्रांच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सभेला उपाध्यक्ष असगर दळवी, संचालक अल्ताफ काझी, बशीर मुरतूझा, मोहम्मद रोगे, दिलीप मुजावर, तसनीम काझी, फरीदा काझी, समीर मुल्ला, मकबूल सुर्वे, शाहिद बारमारे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर युसूफ कोंडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुश्ताक अंतूले यांच्यासहित , बँकेचे सभासद, अधिकारी-कर्मचारी आणि बँक कर्मचारी युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळात ग्राहकसेवा अधिक सक्षम करणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कार्यक्षमता, पारदर्शकता, सुशासन आणि शाश्वत विकास यावर भर देण्यात येणार आहे. सभासद, ग्राहक, ठेवीदार, अधिकारी-कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सामूहिक प्रयत्नांतून कोकण बँकेला आणखी उंचीवर नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.