गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगावात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी माणगांव पोलिसांनी केलेल्या काटेकोर नियोजनाला यंदा मोठे यश मिळाले असून, नागरिकांकडून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माणगांव पोलीस ठाण्याचे PI मारुती अंधाळे यांच्यावर अभिनंदचा वर्षाव होत आहे.
याच पार्श्वभूमीवर माणगांवचे रहिवासी शंकर बी. शिंदे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन PI अंधाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या माणगावकरांना यंदा मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. PI अंधाळे यांच्या केबिनमध्ये पुष्पगुच्छ, शाल व अभिनंदनपर सत्कारांच्या वस्तूंनी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, माणगांव तालुका NH-66 वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉ. इरफान अंतुले व त्यांची टीमही PI मारुती अंधाळे यांचा सत्कार करणार असल्याची माहिती आहे. तसेच डॉ. नरेंद्र सिंह यांनी या प्रतिनिधीशी बोलताना माणगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगितले. “माणगावच्या इतिहासात गेल्या १७ वर्षांत प्रथमच एवढी सुरळीत वाहतूक पाहायला मिळाली,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी मोठ्या मेहनतीने वाहतुकीवर नियंत्रण मिळवून केलेल्या नियोजनाचे हे यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, माणगाव बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही वाहतूक नियोजन करताना बायपासच्या काही अपूर्ण कामाच्या भागातील रस्त्याचाही आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी नियंत्रित पद्धतीने वापर करण्यात आल्याचे दिसून आले. उपलब्ध रस्ते, पर्यायी मार्ग आणि वाहतुकीची परिस्थिती यांचा योग्य समन्वय साधत पोलिसांनी वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे बायपासचे काम अपूर्ण असतानाही त्याचा उपलब्ध भाग वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावीपणे वापरण्याचे नियोजन माणगावच्या वाहतूक व्यवस्थापनातील आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
विशेष म्हणजे, सत्कारापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारे PI अंधाळे यांचे उदाहरण यावेळी समोर आले. सत्कार स्वीकारण्याऐवजी ते प्रत्यक्ष वाहतूक कोंडीच्या ठिकाणी आपल्या पथकासह वाहतूक नियंत्रण करताना दिसले. गणेशोत्सवाच्या सुमारे १५ दिवस आधीपासूनच त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ‘ब्ल्यू प्रिंट’ व रोडमॅप तयार करण्यास सुरुवात केली होती.
११ ते १३ सप्टेंबरदरम्यान PI अंधाळे हे वाहतूक चौकी, NH-66 व विविध ठिकाणी सतत पेट्रोलिंग करत होते. या काळात त्यांनी पोलीस ठाण्यात न जाता प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतूक व्यवस्थापनाची धुरा सांभाळली. १४ सप्टेंबर रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली, तीही गणेशभक्त सुरक्षितपणे व वेळेत आपल्या गावी पोहोचल्याची खात्री केल्यानंतरच.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाही रात्री सुमारे ९ वाजता PI अंधाळे यांनी आपल्या पोलीस पथकासह माणगांव शहरात रूट मार्च काढून परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण नियोजनामुळे यंदा माणगांवकरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून प्रत्यक्ष भेटी, दूरध्वनी व संदेशांद्वारे PI अंधाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.