माथेरानमध्ये भाजपाकडून गणेशभक्तांना २१ प्रकारच्या पूजेच्या साहित्याचे वाटप

माथेरानमध्ये भाजपाकडून गणेशभक्तांना २१ प्रकारच्या पूजेच्या साहित्याचे वाटप
कर्जत | गणेश पवार
माथेरानकरांचे उत्सव आनंदात आणि समाधानात जावे या उद्देशाने माथेरान शहर भाजप शाखेच्या वतीने ज्या भक्तांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत अशा गणेश भक्तांना पूजेचे समान भक्तिमय वस्तू भेट स्वरूपात दिल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त करत भाजप शाखेवर कृतज्ञता व्यक्त केली आहे.
 मागील तेरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टी शाखा माथेरान यांच्या वतीने गणेशभक्तांना पूजेच्या सामानरुपी भेटवस्तू दिल्या जातात. माथेरानमध्ये दीड,पाच,सात आणि दहा दिवस मिळून एकूण 115 गणपती विराजमान होणार आहेत अशा सर्व गणेशभक्तांना 21 प्रकारचे पूजेचे साहित्य भेट रुपात दिले आहे. गुरुवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता डीवाईन कलेक्शन येथे हे वाटप आयोजित केले होते. माचीस पासून अत्तर  पर्यंत अशा एकूण 21 वस्तू यामध्ये देण्यात आल्या. दीड दिवसाला जेवढे सामान लागते तितके समान देण्यात आले तसेच पाच,सात आणि दहा दिवसांच्या प्रमाणे भेटवस्तूंचे डब्बे बनवून गणेश भक्तांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ,उपनगराध्यक्ष संतोष शेलार,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव,जेष्ठ कार्यकर्ते अरविंद शेलार,किरण चौधरी,शैलेश चाफेरकर,युवा मोर्चा कार्यकर्ते शंतनू जमदाडे,महिला आघाडीच्या सुहासिनी शिंदे,नगरसेविका प्रियांका कदम,शीतल कदम यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
 यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले की,ही सेवा 13 वर्षे आम्ही अविरत देत आहोत.माथेरानमध्ये गणेश भक्तांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही या हेतूने प्रेरित होऊन सर्वांना समान वस्तू देण्यात आल्या आहेत. माथेरानमध्ये मोठी बाजारपेठ नसल्याने काही वस्तू मिळत नाही त्या सहज अवगत व्हाव्या यामुळे एकाच मंचावर पूर्ण पूजेचे साहित्य मिळवून आम्ही गणेश भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहोत. याप्रसंगी सर्व गणेश भक्तांनी आपली भेट स्वीकारून समाधान व्यक्त केले.