तालुक्यातील गोवेले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तळ्याची वाडी लोकवस्तीची ओळख निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या तळ्याचे पुनरूज्जीवन करण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी तसेच प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सामाजिक विकास अभियानामध्ये समाविष्ट असलेल्या गोवेले ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या तळ्याची वाडी या लोकवस्तीची ओळख निर्माण करणाऱ्या तळ्यातील पाणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटून गेले आहे. त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच रायगड जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागामार्फत पाठपुरावा करण्यात आल्यास या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याच्या कामास संभाव्य पाणीटंचाई निवारणकामी दुष्काळी काम म्हणून प्राधान्य दिले जाऊ शकते.
महाराष्ट्र शासनाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी गाळयुक्त शिवार योजनेला कायमस्वरूपी मान्यता दिली असून जुन्या तलावांची माती काढणे, तलावाची पावसाळी साठवून क्षमता वाढवणे, गावातून काढलेली सुपीक माती शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवणे, पुनरुज्जीवन, गाळ काढणे तलावांची खोली वाढवणे, पाणीसाठा क्षमता वाढवणे, पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, पाणी अधिक काळ साठवून ठेवणे, विहिरी आणि बोअरवेल यांच्या भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे अशी कामे या योजनेतून करण्यात येतात. या अंतर्गत ग्राम पंचायत आणि गावातील सार्वजनिक तलाव स्थानिक स्वराज्य संस्था आणि जलसंधारण प्रकल्पांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, गोवेले तळ्याची वाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
दुष्काळग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील गाई गुरांना दुष्काळी अन्न पुरवठा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री बळीराजा चारा संजीवनी योजनेंतर्गत नुकताच तळ्याची वाडी येथील गायरान माळावरील गवताची कापणी करून चाऱ्याचे भारे बांधून पाठविण्याचा संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला असता तळ्याच्या वाडीच्या या सर्वश्रृत तळ्याचे पाणी आटल्याकडे शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच लोकप्रतिनिधीचे दूर्लक्ष झाले.