राजकीय सत्तेसाठी महायुतीचा झेंडा एकत्र खांद्यावर घेणाऱ्या पक्षांमध्ये परस्पर सन्मानाचा धागा मात्र कमकुवत होत आहे का? असा प्रश्न रायगडच्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांच्यावरील राजा केणी यांच्या टीकेनंतर आणि युवा सेनेकडून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून फोटो फाडण्यात आल्याच्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त केली.
शनिवारी अलिबागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. राजा केणी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांचे पोस्टर फाडून पायाखाली तुडविण्यात आले. या आंदोलनातून भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांकडून होणाऱ्या टीकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी सांगितले की, भाजपने महायुतीचा धर्म कायम पाळला आहे. मात्र, मित्रपक्षांतील काही नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. परप्रांतीय या शब्दाचा अर्थही त्यांना समजलेला दिसत नाही. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीचे राजकीय गणित एकत्र असले, तरी कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी वेगळीच कहाणी सांगत आहे. युती टिकविण्यासाठी परस्पर सन्मान आणि संयमाची जबाबदारी दोन्ही बाजूंनी पाळली जाणार का, हा प्रश्न या आंदोलनामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.