गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद क्षेत्रातील १९ गावांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता निर्णय लादल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी निर्णय पुढे रेटल्यास ‘रक्तरंजित क्रांती’ घडविण्याचा इशारा दिल्याने या प्रश्नाला आता संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल येथील काश्यप हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत १९ गावांच्या समावेशाचा ठराव मंजूर झाल्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावांच्या विकासाला विरोध नसून स्थानिकांची संमती, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर उपाध्यक्ष रोहन पाटील यांनी महापालिका प्रशासनासमोर १४ प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची औपचारिक उत्तरे न देता ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान होईल, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने मांडावी, असे त्यांनी सांगितले. तर २७ गाव समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरही ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावून ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय समावेशाची प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.