कर्जत तालुक्यातील निसर्गसंपत्ती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी रविवारी (२२ नोव्हेंबर) कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समिती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. प्रस्तावित टोरंट, पोशीर आणि शिलार धरण प्रकल्प रद्द करण्याची मागणी करतानाच टोरंट प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या हजारो झाडांच्या वृक्षतोडीचा निषेध यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, या पर्यावरण बचाव मोहिमेला विविध राजकीय पक्षांनीही समर्थन देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यामुळे पर्यावरणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष आणि नागरिक एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तर कशेळे आणि कळंब बाजारपेठेतील मुख्य नाक्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोहिमेला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. नागरिकांनाही स्वाक्षरी करून पर्यावरण बचावाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कर्जत तालुक्यातील जंगलसंपत्ती, जैवविविधता आणि नैसर्गिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांचा फेरविचार करून ते रद्द करण्यात यावेत, अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात आली. विशेषतः टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. दरम्यान, सायंकाळी कर्जत शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कँडल मार्च काढण्यात आला. हा मार्च महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर त्याचा समारोप करण्यात आला. हातात मेणबत्त्या घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या मार्चमध्ये सहभाग नोंदविला.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्षांचे समर्थन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कँडल मार्चमधून व्यक्त झालेला निषेध यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यावरण बचावाची चळवळ अधिक व्यापक होत असल्याचे चित्र आजच्या मोहिमेतून दिसून आले.