रायगड | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील १ हजार ५९६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १२ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर बँकांकडून एकूण १२ हजार ७४ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. संगणकीय प्रक्रियेद्वारे तपासणी केल्यानंतर पहिल्या ते चौथ्या यादीपर्यंत एकूण ११ हजार १५६ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १ हजार ५९६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत १२ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. या कर्जमुक्तीमुळे पात्र शेतकऱ्यांवरील कर्जाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, त्यांना शेतीच्या पुढील हंगामासाठी नव्याने आर्थिक उभारी घेता येणार आहे.
