कोपरखैरणे गोळीबाराने हादरले! प्रेमप्रकरणातून दोन युवतींवर गोळीबार; एकीच्या पाठीत गोळी अडकली, दुसरीच्या कानाला दुखापत

रायगड | अमुलकुमार जैन 
 ऐन दिवाळीच्या उत्साहात कोपरखैरणे सेक्टर-१ येथे गोळीबाराची थरारक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन युवतींना लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एका युवतीच्या पाठीमध्ये गोळी अडकली असून दुसऱ्या युवतीच्या कानाला गोळी लागून दुखापत झाली आहे. दोन्ही जखमी युवतींना तातडीने वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. गोळीबारामागील नेमके कारण काय, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोपरखैरणे पोलीस करीत आहेत. दिवाळीच्या सणात घडलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.