
चौक | अर्जुन कदम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक यांचा द्वितीय क्रमांक येऊन तीस लाख रुपयांचे पारितोषिक जिंकल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन प्रामुख्याने काम करर्ाऱ्या ग्रामपंचायतीस, त्यांच्या कामगिरी नुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून अभियानच्या कालावधीत केलेल्या कामाचे मूल्यांकनकरून पुरस्कार निवडीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५/२६ या वर्षात अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार साठी रायगड जिल्ह्यातील चौक ग्रामपंचायतची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (सन २०२५-२६) यात चौक सरपंच रीतू ठोंबरे,ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले,खालापूर गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य,कर्मचारी,विविध सामाजिक कार्यकर्ते,संघटना,कंपनी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हद्दीतील गावांमध्ये सुशासन प्रस्थापित करणे, गावे आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करणे तसेच शाश्वत विकास ध्येये साध्य करणे साठी प्रयत्न केला.पारदर्शक, लोकाभिमुख आणि तत्पर ग्राम प्रशासन तयार करणे, स्वनिधी, सीएसआर (CSR) आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामपंचायत ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जलसमृद्ध, शुद्ध पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर शासकीय योजनांची प्रभावी सांगड घालून विकास साधण्याचा प्रयत्न केला. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर स्थानिक संस्था अधिक सक्षम करून आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि उपजीविकेच्या नवीन संधी उपलब्ध करून दिली.
लोकसहभाग व श्रमदान यात ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून लोकचळवळ उभारण्याचा संकल्प करून चौक ग्रामपंचायत यांचा रायगड जिल्ह्यात डंका वाजविला.या अभियानाची पाहणी करण्यासाठी राज्यातून समिती आली होती.रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर,आमदार महेश बादली,सभापती कृष्णा पारंगे,उपसभापती भाई शिंदे,गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी चौक ग्रामपंचायत यांचे अभिनंदन केले.
Related