नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध समस्या सोडविण्यासह प्रवाशांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई टके आणि किशोर जैन उपस्थित होते. मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
नागोठणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी किशोर जैन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या बैठकीत महत्त्वपूर्ण यश मिळाले. यामध्ये फलाट क्रमांक २ आणि ३ यांची उंची वाढविणे, प्रवाशांच्या सोयीसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे तिकीट आरक्षण खिडकी सुरू करणे, दिवा–सावंतवाडी–दिवा रेल्वेगाडीला नागोठणे स्थानकात थांबा देणे, तसेच आगामी काळात सुरू होणाऱ्या पनवेल–रोहा–पनवेल मार्गावरील सर्व मेमू गाड्यांना थांबा देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. याशिवाय स्थानकातील इतर समस्या आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
रेल्वे व्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्याने नागोठणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागोठणे रेल्वे स्थानकाच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागण्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
