बळीराजा संकटात! भातपीक धोक्यात; दिवाळीवर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांचे हमीभावाकडे लक्ष!

Rice crop at risk
कोलाड | श्याम लोखंडे
रोहा तालुक्यात सर्वत्र खरिपाच्या भात कापणीसह बांधणी झाडणी मळणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, यंदा परतीचा पाऊस वेळेआधीच गायब झाल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने भाताचे पीक अक्षरशः धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती निर्माण झाल्याने आता बळीराजाचे संपूर्ण लक्ष उरल्यासुरल्या धानाच्या पिकाकडे आणि सरकारच्या धान हमी भावाकडे (MSP) लागले आहे. “वर्षभर घाम गाळूनही पिकाला योग्य भाव मिळणार की नाही?” त्यात ऐन दिवाळी ही दुष्काळात जाणार असल्याचे संतप्त आणि चिंताजनक सवाल आता रोहा तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.
खर्चामुळे चिंता वाढली
खरीप हंगामातील सुरवातीच्या धान पेरणीला पाऊस लांबला तद्दनंतर जोरदार बरसला त्या पूरपरिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले धान वाहून गेले.त्याचे केलेले पंचनामे शासन दरबारी पटलावर असताना देखील त्यात पुन्हा दुबार पेरणी करत भाताची लागवड केली. दरम्यानच्या काळात मात्र पाऊस समाधान कारक झाल्याने हिरवीगार भातशेती डोळाने डोलू लागली. कणसे धरली मात्र धान पिकास येणार त्यात गणपती नंतर पावसाने ऐन पिकांच्या गरजेच्या वेळी पावसाने दगा दिला. परतीचा पाऊस झाला नाही पुरेसा पाणी पिकांना मिळाले नाही.पाऊस अचानक कमी झाल्याने आणि उष्णता वाढल्याने भाताची कणस अथवा लोंबी सुकून गेल्या केवळ बळीराजाच्या पदरात केवळ धानाची पलंज आहे. दाणे भरण्यापूर्वीच पीक करपण्याच्या मार्गावर गेल्याने बळीराजाला धानाचा तोटा येत असल्याचे धान पिकांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजाच्या डोक्यावर खर्चाचा डोंगर, त्यात उत्पन्नाची खात्री नसल्याने त्याची यंदाची दिवाळी ही दुष्काळी दिवाळी असल्याने तो मोठ्या चिंतेत पडला आहे.
शेतीसाठीची मशागत, बी बियाणे, खते आणि आता कापणीसाठी लागणारा मजुरीचा किंवा अत्याधुनिक यंत्राचा खर्च हा गगनाला भिडला आहे. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्याला धान पिकाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा बळीराजा मोठा अधिक चिंतेत सापडला असल्याने याबाबत माय बाप राज्य सरकार केंद्र सरकार काही मार्ग काढणार का याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
धानाला योग्य हमी भाव मिळेल काय? 
दरवर्षीप्रमाणे यंदाही “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू” शेतकऱ्यांना योग्य तो हमी भाव देणार अशा घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न त्यात खरेदी केंद्र कधी सुरू होणार? भात कापणी झोडणी मळणी सुरू झाली तरी शासकीय धान्य खरेदी केंद्रे अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून भात खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे. तसेच यंदाच्या तुलनेत वाढीव हमी भाव मिळणार का? वाढत्या महागाईच्या काळात सरकारने जाहीर केलेला हमी भाव खर्च वसूल करण्यासाठी पुरेसा आहे का? आणि तो थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडणार का असे तर्क वितर्क व्यक्त  केले जात आहेत.
———————————————
बळीराजाची यंदाची दिवाळी ही दुष्काळी दिवाळी असल्याचे धान पिकांवरुन दिसून येत आहे.”पावसाने आधीच घात केलाय, पीक हातचं जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे .  साऱ्या जगाला पोसणारा तथा अन्न धान पुरवठा करणारा खरा पोशिंदा  हा  बळीराजा  आहे. रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून जे काही हातात पडेल, त्याला तरी सरकारनेयोग्य आणि चांगला हमीभाव दिला पाहिजे. राज्य सरकारच्या दुष्काळी यादीतून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका वगळला त्यामुळे सरकारला आतातरी  जाग येईल का?  निसर्गाच्या  लहरीपणामुळे  आधीच  होरपळलेल्या रोहा तालुक्यातील शेतकऱ्याला मागील दोन दिवसांपूर झालेल्या वादळी पावसामुळे मोठा धोका बसला आहे त्यामुळे आता  सरकारी  मदतीची  आणि हक्काच्या हमी भावाची आस आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लक्ष लागले आहे.
…. शेतकरी पुत्र डॉ. मंगेश सानप.