अलिबाग तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पानांवरील ठिपके (Leaf Spot / Blight Disease) हा रोग चिंतेचा विषय ठरू शकतो. तालुक्यात सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड असून चौल, आक्षी आणि नागाव परिसरात सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर सुपारीच्या झाडांवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सुपारीच्या पानांवर लहान गोलाकार काळे किंवा गडद तपकिरी ठिपके पडणे, ठिपक्यांभोवती पिवळसर कडा तयार होणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. रोग वाढल्यास ठिपके एकमेकांत मिसळून मोठे चट्टे तयार होतात. त्यामुळे पाने सुकून गळण्याची शक्यता असते. विशेषतः दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो.
मात्र, रोगाची लक्षणे दिसल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी कृषी विभागाने प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. चौल, आक्षी आणि नागाव येथील सुपारी बागांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून रोगाचा प्रादुर्भाव, बाधित झाडांची संख्या आणि संभाव्य नुकसान याचा आढावा घेणे गरजेचे आहे. रोग नियंत्रणासाठी बागेतील रोगट पाने गोळा करून नष्ट करणे, पाण्याचा योग्य निचरा राखणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच कृषी सहाय्यकांमार्फत गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित केल्यास बागायतदारांना त्याचा फायदा होऊ शकतो.
सुपारी हे या परिसरातील बागायतदारांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे २२५ हेक्टर क्षेत्रावरील या पिकाचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने केवळ सल्ले देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन पाहणी व मार्गदर्शन करण्याची गरज आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वेळीच सर्वेक्षण आणि सामूहिक नियंत्रण मोहीम राबविणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.