तालुक्यातील जुन्या कशेडी घाटातील येलंगेवाडीच्या हद्दीमध्ये बिबट्याने पार्टेवाडी येथील एका शेतकऱ्याची दुभती गाय खाल्ल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. परिसरातील भयभीत झालेल्या ग्रामस्थांना यासंदर्भात वनविभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
पोलादपूर तालुक्यातील जुन्या कशेडी घाटातील पार्टेवाडी गावातील शेतकरी ग्रामस्थ तुकाराम रावजी जाधव उर्फ पार्टे यांची दुभती गाय बिबट्याने खाल्ल्याने ती ठार झाली. ऐन दिवाळी सणात या शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबावर दुध विकून उदरनिर्वाहाचे साधन गमावल्याने उपासमारीची वेळ ओढवली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रविवारी सकाळी ही गाय शेतकऱ्याने चरण्यासाठी रानात सोडली होती. दुपारी नेहमीप्रमाणे गाय परत न आल्याने शोध घेतला असता जुन्या कशेडी घाटातील येलंगेवाडीच्या हद्दीमध्ये गायीला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सोडून बिबट्या पसार झाला होता, असे दिसून आले.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर दुतर्फा घनदाट जंगल आणि डोंगर दर्याखोर्यांनी व्यापलेला हा भाग असून रस्ता दुरुस्तीचे काम रडतखडत चालल्याने वाहनांची वर्दळ तुरळक प्रमाणात होत आहे. परिणामी, दिवसाढवळ्या या परिसरात बिबट्याचा वावर सुरू झाला असल्याचे अनुभव पार्टेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत जाधव, भारत जाधव व पळचिल गावचे प्रेम निविलकर यांनी सांगितले. बिबट्याचा वावरण्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी तसेच गुराखी यांच्यामध्ये भिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पोलादपूर वनविभागाचे वनपाल बाजीराव पवार यांनी, संबंधित ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा केल्याची माहिती देत गाय गमावलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी वनपाल पवार यांनी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी घाबरून न जाता खबरदारीचा उपाय म्हणून विशेषतः रात्रीच्या वेळी बॅटरी आणि हातात काठी घेऊन घराबाहेर पडावे आणि एकटे ये-जा करणे टाळावे असे आवाहनही वन विभागातर्फे केले आहे.