उरण नगरपरिषदेमध्ये गेली २० वर्षे पी. के. ठाकूर या ठेकेदाराकडे संपूर्ण उरण नगरपरिषद हद्दीतील, उरण शहरासह पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्तीचे काम करणारे ४ कामगार आणि संपूर्ण सार्वजनिक शौचालय स्वच्छता करणारे ६ कर्मचारी कार्यरत आहेत.
या १० कष्टकरी कामगारांना गेल्या २ वर्षांचा बोनस आणि गेल्या २ महिन्यांचा पगार अद्याप दिलेला नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित व सुरळीत राहावा, तसेच संपूर्ण उरण शहर आजूबाजूच्या ग्रामपंचायती तसेच संपूर्ण तालुक्यातून बाजारहाटासाठी उरण बाजारपेठेत येणाऱ्या जनतेला सार्वजनिक शौचालयांची सोय मिळावी, यासाठी हे कामगार रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र दिवाळीसारख्या सणाला देखील त्यांना त्यांचा मेहनताना मिळालेला नाही. त्यांच्या श्रमावर ठेकेदार लाखो रुपये कमवत आहे, असा कामगारांचा आरोप आहे.
पी. के. ठाकूर यांची आज जी काही मालमत्ता आहे, ती याच उरण नगरपरिषदेच्या ठेक्यामुळे, म्हणजेच याच कामगारांच्या श्रमावर उभी राहिली आहे, असेही कामगारांचे म्हणणे आहे. पी. के. ठाकूर हे हयात असताना असा प्रश्न कधी निर्माण झाला नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे पुत्र अनिरुद्ध ठाकूर यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे कामगारांनी सांगितले.
या संदर्भात कामगारांनी म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याकडे निवेदन दिले. तसेच नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर आणि मुख्याधिकारी समीर जाधव यांनाही निवेदन देण्यात आले.
कायद्यानुसार ठेकेदाराच्या कामगारांचे मुख्य मालक म्हणून मुख्याधिकारी समीर जाधव, उरण नगरपरिषद यांनी आपली जबाबदारी स्वीकारली नाही, केवळ औपचारिकता करण्याचे काम मुख्याधिकारी करत आहेत परंतू प्रत्यक्षात प्रश्न सुटला पाहिजे असे मुख्याधिकारी श्री समिर जाधव यांना वाटत नाही असा युनियनचा आरोप आहे.
प्रश्न न सुटल्याने म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांनी तातडीने लेखी पत्र देऊन सदर प्रश्न सोडविण्याची सूचना केली. मात्र कोणीही जबाबदारीने प्रश्न न सोडविल्याने कामगारांनी नाईलाजास्तव काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कुटुंबीयांना दिवाळी साजरी करता यावी, संबंधितांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे व न्याय मिळावा, याच उद्देशाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार, असा ठाम निर्णय कामगारांनी घेतला आहे.