दुर्लक्षित नागोठणे एस. टी. बस स्थानक समस्यांच्या विळख्यात

नागोठणे | महेंद्र माने 
एस.टी.स्थानक म्हणजे नागोठणे विभाग व राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण. विभागातून शहरात रोज हजारो लोक खरेदी विक्री व इतर कामांकरीता येत जा करीत असतात. त्यांना प्रवासाचे मुख्य वाहन म्हणजे एस.टी. बसेस तसेच या परिसरात अनेक कंपन्या असून येथील कामगार व शहरातून कामानिमित्त मुंबई, श्रीवर्धन, महाड, पोलादपूरसह कोकणात गावी जाण्यासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांची बस स्थानकात कायम थोड्या फार फरकाने गर्दी असते. परंतु रोहा आगारातून दुर्लक्षित होत असलेल्या नागोठणे एस.टी. बसस्थानक हे अनेक समस्यांच्या विळख्यात आहे.या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची प्रवाशांची मागणी आता जोर धरत आहे.
बेजबाबदार खाजगी पार्किंग समस्या 
येथील बाजारपेठ ही विभागात महत्वाची असल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक व इतर ठिकाणी दररोज प्रवास पहाटे करणारे आपले वाहन अधिकृत पार्किंगमध्ये न करता स्थानकाच्या आवारात कुठेही पार्किंग करतात.व उशिरा येणारे जागा मिळेल तिथे बेजबाबदारपणे पार्किंग करीत असल्याने दररोज येणार्‍या बसला आपल्या नियोजित ठिकाणी गाडी लावता येत नाही व ट्राफिकही होत असते.तसेच स्थानकातून गाडी आल्याची सूचना मिळताच प्रवाशांचीही गाडी शोधताना तारांबळ उडते. स्थानकाचा रहादरीसाठी वापर – सदरील स्थानकातून खाजगी वाहनांचा रहादरीसाठी वापर होत आहे.तसेच ते वेगात जात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरक्षा रक्षकाची मागणी 
सदरील स्थानकात बेकायदेशीर कुठेही करण्यत येत असलेली पार्किंग,त्यासाठी वाद घालणारे चालक,आवाराचा रहदारीसाठी वापर करणारे वाहन चालक,तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी एक कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. उपहारगृहाची कमतरता- स्थानकाच्या आवारात असलेले उपहारगृह अनेक वर्षे बंद आहे. उपहारगृह बंद असल्याने येथील प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना स्थनाकाबाहेरील हॉटेल व दुकानांचा आधार घ्यावा लागतो. बर्‍याचदा लांबा पल्ल्याच्या बसमधील कोणी प्रवाशी काही खाद्य पदार्थ घेण्यासाठी बाहेर गेला व त्याला येण्यास उशीर झालाच तर त्या बसमधील वाहकाला त्याला शोधण्याची वेळ येत असते.तसेच उपहारागृहाची व्यवस्था नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या आत येण्याचे टाळत असल्याचे प्रवाशी वर्गाकडून बोलले जात आहे.
निवारा शेडची कमतरता 
येथील एसटी स्थानक आवारातून मुंबई,पुणे,नाशिक,शिर्डी,अलिबाग, मुरुड,श्रीवर्धन, महाड- पोलादपूरसह कोकण व घाट माथ्यावर जाणार्‍या लांब पल्याच्या गाड्या या स्थानकामध्ये ये– जा करीत असतात. मुंबईकडे जाणारे प्रवाशी बसची वाट बघताना एसटी स्थानकाचा वापर करू शकतात.परंतु पाली, पुणे, नाशिक तसेच कोलाड, श्रीवर्धन, महाड व कोकणात जाणार्‍या प्रवाशांना स्थानकासमोरील रसवंती गृहाच्या बाजूला रार्व प्रवाशांना उन्हात उभे राहून बराच वेळ बसची वाट पहावी लागते. तेथे शेड नसल्याने वयोवृध्द, लहान मुले,महिलांसह शाळा – कॉलेज विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात मुसळधार पावसात उभे राहावे लागते. सदरील प्रवाशांना होणारा त्रास व असलेली गैरसोय दूर होण्यासाठी या ठिकाणी तातडीने प्रवाशी शेड होणे गरजेची असल्याची मागणी प्रवाशी वर्ग करीत आहेत.
———————————–
खाजगी वाहन चालकांची अरेरावी 
स्थानकात अनेक प्रवासी येत असल्याने उपहारगृहाची तसेच महाड पाली मार्गावर निवारा शेडचीही आवश्यकता असून आवारात येणार्‍या खाजगी वाहन चालकांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असून सदरील चालकांना वाहन बाहेर काढण्यास किंवा अधिकृत पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले असता ते असेरावी करीत शिवीगाळ करत वाद घालत असतात. तसेच रहादरीसाठी वापरणार्‍या वाहन चालकांना जरब बसावी याबाबत रोहा आगार व्यवस्थापकांना लेखी कळविले असाता त्यांनी पोलिस स्टेशनला कळविणे असा रिमार्क मारून पाठविले आहे. स्थानकातील बेकायदेशीर पार्किंग तसेच स्थानकातून रहादरीसाठी वापरणार्‍या वाहन चालकांना जरब बसावी यासाठी सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे.
…मनोहर पवार, वाहतूक नियंत्रक, नागोठणे एस.टी. बस स्थानक