पेणमध्ये आगीचा तांडव! रॉकेट फटाक्यामुळे तीन फ्लॅट जळून खाक

पेण | प्रतिनिधी 
 रायगड जिल्ह्यातील पेण-खोपोली मार्गावरील उत्कर्ष नगर येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. रॉकेट फटाका थेट चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत एकूण तीन फ्लॅट जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी झालेल्या विलंबामुळे आग अधिक पसरल्याचे समोर आले आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये फटाके फोडले जात होते. यावेळी उडविण्यात आलेला रॉकेट फटाका थेट बी विंगमधील चौथ्या मजल्यावर असलेल्या प्रेम तेलवणे यांच्या फ्लॅटमध्ये शिरला. त्यामुळे फ्लॅटमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केले. या आगीत प्रेम तेलवणे यांचा फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला.
 चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने पाचव्या मजल्यावरील प्रसाद गुप्ता यांचाही फ्लॅट आगीच्या विळख्यात सापडला. आगीचा वेगाने फैलाव होत असल्याने अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत एकूण तीन फ्लॅट जळून खाक झाले असून, फ्लॅटमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपार्टमेंट परिसरात अग्निशमन दलाचे वाहन नेण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने बचावकार्य सुरू करण्यात अडथळे निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. या विलंबादरम्यान आगीचा फैलाव आणखी फ्लॅटपर्यंत झाला. या घटनेमुळे सणासुदीच्या काळात फटाके फोडताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.