दिशादर्शक फलकावर राजकीय बॅनरचा कब्जा; पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

अलिबाग | अमुलकुमार जैन

मुरुड-सालाव मार्गावर रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालाव तपासणी नाक्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या दिशादर्शक भिंतीचा वापर सध्या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती आणि शुभेच्छा बॅनरसाठी केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या भिंतीचे मूळ उद्दिष्टच बाजूला पडल्याचे दिसत आहे.
सालाव पुलावरून मुरुडच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिक वाहनचालकांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात या मार्गावर वाहनांची संख्या वाढते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक भिंतीवर विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष रस्त्यावरील दिशादर्शक माहितीऐवजी या बॅनरकडे वेधले जाण्याची शक्यता आहे.
वाहन चालविताना काही क्षणांचे लक्ष विचलित होणेही अपघातास कारणीभूत ठरू शकते. विशेषतः पुलावरून उतरल्यानंतर वाहनांचा वेग नियंत्रित करत पुढील मार्गाचा अंदाज घेणे आवश्यक असताना अशा प्रकारे जाहिरातींचे प्रदर्शन होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या सोयीसाठी उभारलेल्या दिशादर्शक भिंतीवर अशा प्रकारे बॅनर लावण्यास परवानगी दिली आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने या प्रकाराची पाहणी करून दिशादर्शक भिंतीवरील बॅनर तातडीने हटवावेत, तसेच भविष्यात अशा सार्वजनिक सुविधांचा जाहिरातींसाठी वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.
दिशा दाखवणाऱ्या भिंतीवर राजकीय चेहरे झळकत असताना, वाहनचालकांच्या सुरक्षिततेची दिशा कोण ठरवणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.