तालुक्यातील वनराई बंधाऱ्यांची कामे श्रमदान तसेच जेसीबीचा वापर करून युध्दपातळीवर सुरू असताना तब्बल 10-12 वर्षांपूर्वी मोठया आर्थिक अपहारामुळे निरूपयोगी ठरून तालुका कृषी कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्यास कारणीभूत ठरलेल्या केंद्रीय पाणलोट कार्यक्रमांतर्गत सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ उपसा करून किरकोळ दुरूस्ती करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे नाणेघोळ केवनाळे येथील सिमेंट बंधाऱ्यामध्ये तब्बल दीड ते दोन लाख टिएमसी पाणी अडविण्यात यश आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयामार्फत केंद्रीय पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेले 50 सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याचे काम पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत होत असल्याने पाणीटंचाईवरील हा उपाय पंचायत समितीचा का कृषी विभागाचा अशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रशासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून 87 गावांच्या 43 पाणलोट व्यवस्थापन कमिटया तयार करण्यात येऊन त्यांचे 7 समूह तयार करण्यात आले. या समूहांमध्ये विविध कृषीविकास कामांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 2.55 कोटी रूपये खर्चाचे 35 सिमेंट बंधाऱ्यांचे नियोजन असताना 50 सिमेंट बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट राबविण्यात आले. पार्ले, लोहारे, दिवील, तुर्भे बुद्रुक, काटेतळी या गावांत प्रत्येकी 2 तर चरई, तुर्भे खोंडा, वझरवाडी, सवाद, हावरे, माटवण, सडवली, धारवली, बोरज, उमरठ, गोवेले, ढवळे, खोपड, कुडपण, परसुले, महाळुंगे, रानवडी, बोरावळे, फणसकोंड, भोगाव बुद्रुक, कातळी, ओंबळी या गावात प्रत्येकी 1 असे सिमेंट बंधारे बांधण्याचे प्राथमिक उद्दीष्ट ठेवण्यात आले.
पोलादपूर तालुका तालुक्यात सर्वत्र या सिमेंट बंधाऱ्यांच्या ‘ओव्हरफ्लो’ची चर्चा सुरू झाली. उन्हाळी पाणीटंचाईग्रस्त होणाऱ्या पोलादपूर तालुक्याला या बंधाऱ्यांतील पाण्यामुळे दिलासा मिळणार असून ज्या पाणलोट व्यवस्थापन कमिटयांनी अंतर्गत मतभेदांमुळे सिमेंट बंधाऱ्यांचे काम अर्धवट सोडून दिले; त्यांना ग्रामस्थांचे टंचाई काळात बोल ऐकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, वर्षभरातच हे सर्व सिमेंट बंधारे पाणी अडविण्यात आणि जिरविण्यात निकामी ठरल. त्यामुळे पोलादपूर तालुका पुन्हा पाणीटंचाईच्या गर्तेत लोटला गेला. भोगाव कातळीतील सिमेंट बंधाऱ्यात भेगा पडून फुटला आणि अन्य बंधारे गाळाच्या गर्तेत रूतले. अलिकडेच, पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी या सिमेंट बंधाऱ्यांच्या गाळ उपशाची पाहणी केली आणि याठिकाणी पाणी अडविण्यासाठी स्टीलच्या प्लेटांचा वापर करण्यासंदर्भात सूचना दिल्या. आता भोगाव येथील केंद्रीय पाणलोट कार्यक्रमातील सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची क्षमता प्राप्त झाली असून लवकरच भोगावमधील पाणीटंचाईचे चित्र निवळण्यास हातभार लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाड व पोलादपूर तालुक्यातील नद्या व उपनद्यांमधील गाळउपसा करण्याच्या 37 ठिकाणांच्या निविदांद्वारे रायगड पाटबंधारे विभाग कोलाडमार्फत 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या मुदतीत प्रयत्न सुरू असताना सध्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्री वनराई बंधाऱ्यांद्वारे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ सुरू झाले आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात जेसीबी, प्रोकलेन आणि डम्पर्सचा वापर करण्यात येऊन सिमेंट बंधाऱ्यांमधील गाळ उपसा सुरू असून या कामांसाठी यंत्रांची देयके रायगड पाटबंधारे विभाग कोलाडमार्फत अदा करण्यात येण्याची शक्यता असल्यास ग्रामस्थांच्या श्रमदानाची जागाही यंत्रांची देयके घेऊ शकणार आहेत. अशातच, केंद्रीय पाणलोट कार्यक्रमांतर्गत पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढण्याकामी यंत्रांचा वापर सुरू करण्यात आला आहे. परिणामी, पोलादपूर तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आणि गाळाच्या गर्तेत बुडालेले सर्वच सिमेंट बंधारे पाणी अडविण्यासाठी सज्ज झाले असून यापुढे तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपयुक्त ठरण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
केवनाळे नाणेघोळ येथील सिमेंट बंधाऱ्यांमध्ये जुजबी डागडुजी-दुरूस्तीनंतर या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये दीड ते दोन टीएमसी लिटर्स पाणी साठल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अरूण धिवरे यांनी दिली. तालुका कृषी विभागाला या सिमेंट बंधाऱ्यांचे पुढे काय झाले,याची माहिती नाही. मात्र, पाणीटंचाई निवारण आराखडा आणि गाळउपसा विषयामुळे महसूल विभागाने यात विशेष लक्ष दिले असले तरी पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पाणीटंचाई निवारणकामी दरवर्षीप्रमाणे वनराई बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांद्वारे पोलादपूर तालुक्यात पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभागासह श्रमदानासाठी झटताना दिसून येत आहे.